(मतीन शेख)
संग्रामपूर : तालुक्यातील बावनबीर येथील जेमतेम व सामान्य परिस्थितीत वाढलेल्या साद हुसेन अता हुसेन इनामदार याने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवले आहे. त्याची नागपूर येथे नियुक्ती झाली असून अवघ्या २३ व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागपूर येथे तो कार्यरत राहणार असून प्रारंभी प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. संग्रामपूर तालुका आदिवासी बहुल असून ग्रामीण भागात शिक्षणाच्या व स्पर्धा परीक्षांच्या संधी अत्यंत मर्यादित आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सादने हार न मानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला. लहानपणापासूनच पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने स्वतःच्या बळावर अभ्यास करत कठोर मेहनत घेतली. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही त्याने अभ्यास आणि सराव यामध्ये सातत्य ठेवले. अकोला येथे राहून त्याने लेखी परीक्षेसोबतच मैदानी चाचण्यांचीही काटेकोर तयारी केली. अनेक वेळा अपयश, ताणतणाव आणि अडचणींचा सामना करतानाही त्याने धैर्य सोडले नाही. अपयशाला न जुमानता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर आपल्या मेहनतीचे सोने केले. सादच्या यशामुळे बावनबीर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण व सामान्य कुटुंबातील युवकांना मोठी प्रेरणा मिळत आहे. सादच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहेत. त्याचे वडील अता हुसेन इनामदार हे बावनबीर येथील ‘जनता हॉटेल’चे संचालक असून अत्यंत कष्टाळू स्वभावासाठी ओळखले जातात. अत्यंत साध्या परिस्थितीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रेरणेनेच सादने जिद्दीने मेहनत घेत आपले स्वप्न साकार केले. इनामदार परिवारात यापूर्वीही यशाची परंपरा दिसून येते. सादचे चुलत काका जुबेर हुसेन जाकीर हुसेन इनामदार यांची वर्षभरापूर्वी महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली असून ते सध्या अकोला येथे कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सादला योग्य दिशा मिळाली आणि त्याने सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे) रोजी बावनबीर ग्रामपंचायत कार्यालयात साद इनामदार व त्यांचे वडील अता हुसेन इनामदार यांचा ग्रामपंचायतीतर्फे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच/प्रशासक गजानन मनसुटे, उपसरपंच नजीर भाई, मंडळ अधिकारी रविंद्र बोराखडे, ग्राम महसूल अधिकारी विश्वनाथ सुदेवाड, नाजीम काझी, शैलेश शिरसाठ, डॉ.समीर शेख, नदीम शेख, सुपळ कुरेशी, दीपक ढवळे, सागर निवणे, विजय सोळंके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बावनबीरच्या मातीतून उभा राहिलेला साद इनामदारचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आज अनेक युवकांसाठी मार्गदर्शक ठरत असून “जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही परिस्थिती आड येत नाही” हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.