(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात सोमवार दि.१ जुन रोजी सायंकाळी आलेल्या अवकाळी वादळाने मोठा कहर केला. जोरदार वाऱ्यांसह झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही भागांतील घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही नुकसान झाले. अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तालुक्यातील सोनाळा, लाडनापूर, पातुर्डा, काथरगाव, पिंप्री, पळशी झाशी आदी गावांमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने केळीच्या बागा आडव्या झाल्या असून अनेक एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असतानाच निसर्गाच्या या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.