Saturday, November 21, 2026
HomeUncategorizedबुद्धपौर्णिमेच्या रात्री अंबाबरवा अभयारण्यात वन्यजीवांची भरभराट; ६९० प्राण्यांची नोंद, ९ वाघांची उपस्थिती...

बुद्धपौर्णिमेच्या रात्री अंबाबरवा अभयारण्यात वन्यजीवांची भरभराट; ६९० प्राण्यांची नोंद, ९ वाघांची उपस्थिती ठळक

(मतीन शेख)

 

बुलढाणा: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अंबाबरवा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमात यंदा वन्यजीवांची लक्षणीय वाढ दिसून आली. दि. १ ते २ मेदरम्यान सोनाळा वनपरिक्षेत्रात झालेल्या या विशेष गणनेत एकूण ६९० वन्यप्राण्यांची नोंद झाली असून, ९ वाघांच्या उपस्थितीने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या वाघांमध्ये ४ पिल्लांचाही समावेश आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम काटेकोर नियोजनासह राबविण्यात आला. अभयारण्यात ३४ ठिकाणी मचाण उभारून पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करण्यात आले. शुक्रवार दुपारी २ वाजल्यापासून शनिवार सकाळी १० वाजेपर्यंत सलग निरीक्षणाची मोहीम सुरू होती. या मोहिमेत १९ वनरक्षक, ६ वनपाल आणि ४४ वनमजूर सहभागी झाले होते. स्थानिक टूनकी, सोनाळा, वरवट बकाल येथील ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांच्यासह विविध निसर्गप्रेमींनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच पुणे, अमरावती, बुलढाणा आणि बैतूल येथील १५ जणांनी ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी करून जंगलातील हा अनुभव प्रत्यक्ष घेतला. प्राणी गणनेत ९ वाघ, ३ बिबट, १७ अस्वल, ५१ नीलगायी, ८७ सांबर, २० भेंडकी, ४६ गवे, ७९ रानडुक्कर, २०८ माकडे, ३ म्हसण्या उद, ३८ रानकोंबड्या, ८ रानमांजरे, ९० मोर, २० ससे, १० रानकुत्रे आणि १ मुंगूस अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. चांदण्यांच्या प्रकाशात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यजीवांचे रात्रभर निरीक्षण करताना सहभागी निसर्गप्रेमींना थरारक आणि अविस्मरणीय अनुभव मिळाला. या उपक्रमामुळे वन्यजीव संवर्धनाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!