(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद येथील स्थानिक गुप्तवार्ता शाखेत कार्यरत पोलीस शिपाई सचिन राजपूत यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांची बुलढाणा जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद नफीस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना निवेदन सादर केले. दि.२ जून रोजी जळगाव जामोद येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान सय्यद नफीस यांनी हे निवेदन दिले. यावेळी मेहकर आणि मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. निवेदनात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे काही स्थानिक राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राजकीय विरोधक, अल्पसंख्याक समाज आणि दलित बांधवांवर चौकशीच्या नावाखाली दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने स्थानिक प्रशासनावर त्यांचा प्रभाव निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकता कायम राखण्यासाठी त्यांची केवळ बदली न करता बुलढाणा जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विषय गांभीर्याने मांडला. यावर उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या बदलीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सय्यद नफीस यांना संबंधित कर्मचाऱ्याची बदली न झाल्यास दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यास सांगितल्याची माहितीही देण्यात आली.