(मतीन शेख)
यवतमाळ : शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या २४ तासांत शोध घेत यवतमाळ शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या वाहनासह आणखी दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी अंकज बाबुराव आबाळे यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस एमएच-२९-एक्स-८२६९ ही मोटारसायकल २ जून रोजी शासकीय रुग्णालय परिसरातून अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीद्वारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आयुष दया सगोज वय २२ व प्रेम गौतम मेश्राम २१ रा. अशोकनगर, यवतमाळ यांचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी चापडोह चौफुली परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस, हिरो डिलक्स एमएच–२९–एव्ही– ८९०१ आणि विनानंबर बजाज डिस्कव्हर अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची एकूण किंमत १ लाख ११ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ व डीबी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.