(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीत प्रशासक पदावर कार्यरत असलेले हर्षल खंडेलवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे गावातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, राजीनाम्याच्या कारणांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही काळापासून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, नियुक्त्यांमधील कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण झालेल्या शंकांमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत होती. या पार्श्वभूमीवर अचानक दिलेला राजीनामा हा वाढत्या दबावाचा परिणाम असल्याची चर्चा रंगत आहे. खंडेलवाल यांनी आपल्या राजीनाम्यात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी ग्रामस्थ या कारणावर समाधान व्यक्त करत नाहीत. उलट, ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गावात “राजीनाम्याच्या मागे नेमकं काय?” हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. काही ग्रामस्थांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आता पंचायत समिती प्रशासन पुढे कोणती पावले उचलते, तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास कितपत पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“ग्रामपंचायतीतील अनेक निर्णयांबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे. केवळ राजीनामा देऊन जबाबदारी संपत नाही. संबंधित निर्णयांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.”
सतिष वानखडे सामाजिक कार्यकर्ता सोनाळा