(मतीन शेख)
अकोला : जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यवहाराच्या साखळीवर निर्णायक प्रहार करत स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून देशी बनावटीचे कट्टे, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने संशयित हालचालींवर लक्ष ठेवत अचूक सापळा रचला. नियोजनबद्धरीत्या टाकण्यात आलेल्या छाप्यात दत्ता महादेव मोहोळ रा.उमरी ता. तेल्हारा आणि अक्षय संतोष मोहोळ रा.नवी उमरी ता.तेल्हारा यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे कट्टे, एक जिवंत काडतुसे तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची साखळी पुढे नेत पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील शेख अकबर शेख हारून यालाही अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संबंधितांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दहीहंडा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव व पथकातील अधिकारी-कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.