(मतीन शेख)
बुलढाणा: गरीबी, संघर्ष आणि कठीण परिस्थितीशी झुंज देत अखेर संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील रहिवासी शेख साजिद शेख कय्युम यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलात (MSF) निवड मिळवून आपल्या जिद्दीची चमक दाखवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत साजिद यांचे बालपण गेले. कुटुंबाकडे शेतीचा एकही तुकडा जमीन नसल्याने उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लहानपणापासूनच त्यांनी गावोगावी फिरून साबुदाणा विक्री केली. त्यानंतर कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी ऑटो रिक्षा चालवत त्यांनी कष्टाची पराकाष्ठा केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण आणि नोकरीचे स्वप्न त्यांनी कधीही सोडले नाही. अथक मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्र सुरक्षा बलातील निवड मिळवत तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. साजिद यांच्या यशाबद्दल गावातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत असून, “मेहनत कधीच वाया जात नाही,” याचे हे जिवंत उदाहरण असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

