(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या छिन्नविछिन्न मृतदेह प्रकरणाने आता संपूर्ण पोलिस यंत्रणेलाच हादरा दिला आहे. ज्या महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, तीच महिला जिवंत अवस्थेत समोर आल्यानंतर तपास प्रक्रियेतील धक्कादायक त्रुटी उघड झाल्या आहेत. या प्रकरणामुळे पोलिस तपासाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, कनिष्ठ अधिकाऱ्यांना बलिचा बकरा बनवले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणात बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलिस अंमलदार एजाज खान, अमोल शेजोळे आणि अजिस परसुवाले या चार पोलिसांना तपासात हलगर्जीपणा दाखवल्या बद्दल पोलिस मुख्यालयात संलग्न करण्याची कारवाई केली. मात्र, संपूर्ण तपासाची जबाबदारी फक्त या चार कर्मचाऱ्यांवरच टाकली जात आहे काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तपास प्रक्रियेदरम्यान स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक आणि उच्चपदस्थ अधिकारी नेमकी कोणती भूमिका बजावत होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधित महिलेच्या वडील आणि भावाला ताब्यात घेतल्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. आरोपी पकडल्याचे श्रेय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुढे येतात; मात्र तपासातील गंभीर चुका समोर आल्यानंतर जबाबदारी मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ढकलली जाते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. विशेष म्हणजे, मृत घोषित करण्यात आलेली शिवानी कळमेकर ही स्वतः जिवंत अवस्थेत बऱ्हाणपूर पोलिस ठाण्यात हजर झाली असून, “माझे वडील आणि भाऊ निर्दोष आहेत,” असे तिने स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर निर्दोषांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ चार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच तपासातील प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपास यशस्वी झाला तर श्रेय वरिष्ठांचे आणि चुकल्यास कारवाई फक्त कनिष्ठांवरच, हीच का पोलिस व्यवस्थेची कार्यपद्धती?