Friday, June 5, 2026
HomeUncategorizedशिवानी प्रकरणात धक्कादायक यू-टर्न; कारागृहातून बाहेर निघताच वडिलांनीच दिली पोलिसांना क्लीन चिट!...

शिवानी प्रकरणात धक्कादायक यू-टर्न; कारागृहातून बाहेर निघताच वडिलांनीच दिली पोलिसांना क्लीन चिट! म्हणाले माझ्या कारागृहात जाण्यास मीच जबाबदार…

(मतीन शेख)

 

बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या छिन्नविछिन्न मृतदेह प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. मृत समजली गेलेली शिवानी कळमेकर जिवंत आढळल्यानंतर पोलिस तपासावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आली होती. मात्र, आता शिवानीच्या वडिलांनीच पोलिसांना क्लीन चिट दिल्याने या बहुचर्चित प्रकरणाने पुन्हा एकदा नाट्यमय वळण घेतले आहे. राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एका महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा मृतदेह शिवानी कळमेकर हिचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शिवानीचे वडील आणि भावाला ताब्यात घेतल. दरम्यान, शिवानी जिवंत अवस्थेत समोर आल्यानंतर तपास प्रक्रियेवर टीकेची झोड उठली होती. या घडामोडींची गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्हा पोलिस अधिक्षक नीलेश तांबे यांनी तातडीने कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलिस अंमलदार एजाज खान, अमोल शेजोळे आणि अजिस परसुवाले यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांची बदली करण्यात आली. या कारवाईमुळे तपासातील संभाव्य त्रुटींची विभागीय स्तरावर चौकशी सुरू असल्याचे मानले जात आहे. मात्र, प्रकरणाला खऱ्या अर्थाने नवे वळण मिळाले ते शिवानीच्या वडिलांच्या वक्तव्यामुळे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, पोलिसांची काहीच चूक नाही. माझं दिमाग खराब झालं होतं. मुलगी घरातून निघून गेल्याचा आणि पळून गेल्याचा मला प्रचंड संताप होता. त्या रागाच्या भरात आणि मानसिक तणावात मी खून केल्याची कबुली दिली होती. तसेच कारागृहात जाण्यास मीच जबाबदार आहे. या वक्तव्यानंतर पोलिस तपासावरील आरोपांची धार काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा, त्या महिलेची ओळख काय आणि या संपूर्ण प्रकरणामागील सत्य काय, याबाबतचा तपास अद्याप सुरू असून या प्रश्नांची उत्तरे मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!