Friday, June 5, 2026
HomeUncategorized‘मृत’ महिला थेट पोलिस ठाण्यात जिवंत हजर; बुलढाणा पोलिसांचा तपास फसला? निर्दोषांना...

‘मृत’ महिला थेट पोलिस ठाण्यात जिवंत हजर; बुलढाणा पोलिसांचा तपास फसला? निर्दोषांना अटक केल्याचा आरोप! विविध चर्चेला उधाण

(मतीन शेख)

 

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या छिन्नविछिन्न मृतदेह प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले असून, संपूर्ण पोलिस तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या महिलेला मृत घोषित करून तिच्या कुटुंबीयांना अटक करण्यात आली होती, तीच महिला अचानक जिवंत अवस्थेत बऱ्हाणपूर पोलिस ठाण्यात हजर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि.२६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास राजुरा परिसरातील शेतात एका महिलेचे धडापासून वेगळे झालेले मुंडके आढळून आले होते. काही अंतरावर संबंधित महिलेचे धडही सापडले. अत्यंत विद्रूप अवस्थेतील हा मृतदेह पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला होता. त्यानंतर या प्रकरणी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मृत महिला शिवानी कळमेकर असल्याचा दावा करत तिच्या वडिलांसह भावाला अटक केली. विशेष म्हणजे, चौकशीदरम्यान वडील आणि भावाने हत्या केल्याची कबुली दिल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, आता शिवानी कळमेकर जिवंत समोर आल्याने या कथित कबुलीजबाबावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, “ही कबुली दबावाखाली घेतली गेली का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी “बाजीराव मुळे” प्रकरणाचा उल्लेख करत पोलिसांच्या चौकशी पद्धतीवरही टीका होताना दिसत आहे. तथापि, या संदर्भात अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कथित मृत महिला शिवानी कळमेकर ही स्वतः बऱ्हाणपूर पोलिस ठाण्यात हजर झाली आणि “माझे वडील व भाऊ निर्दोष आहेत, त्यांना तात्काळ सोडा,” अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण तपास नव्याने करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, राजुरा शिवारात सापडलेला छिन्नविछिन्न मृतदेह नेमका कोणाचा? मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी झाली होती का? पोलिसांनी पुरेशी खातरजमा न करताच आरोपींना अटक केली का? अशा अनेक प्रश्नांनी पोलिस तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिसांच्या घाईगडबडीतील तपासावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, निर्दोषांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला का, अशी चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. सध्या पोलिसांकडून सापडलेल्या मृतदेहाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!