Friday, June 5, 2026
HomeUncategorizedसोनाळा ग्रामपंचायतीतील भरती प्रकरण चिघळले! विरोधाभासी पत्रांमुळे संशय, तक्रारदारांचा आत्मदहनाचा इशारा

सोनाळा ग्रामपंचायतीतील भरती प्रकरण चिघळले! विरोधाभासी पत्रांमुळे संशय, तक्रारदारांचा आत्मदहनाचा इशारा

(मतीन शेख)

 

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीतील कथित नियमबाह्य पदभरती प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले असून, ग्रामपंचायतीकडून जारी करण्यात आलेल्या दोन अधिकृत पत्रांतील विसंगतीमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशीला होत असलेल्या विलंबामुळे संतप्त झालेल्या तक्रारदारांनी थेट आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्याने पंचायत समिती प्रशासनात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या एका अधिकृत पत्रात कोणतीही पदभरती करण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या मासिक सभेच्या ठरावात कायमस्वरूपी कार्यालयीन पदभरतीचा स्पष्ट उल्लेख असल्याने या दोन्ही कागदपत्रांमधील विरोधाभास चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही पत्रांवर अधिकृत स्वाक्षऱ्या आणि शिक्के असल्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अधिक जोर धरत आहे. या संदर्भात पंचायत समिती स्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी गटविकास अधिकारी माधवराव पायघन आणि चौकशी अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्याकडून चौकशी प्रक्रियेत टाळाटाळ होत असल्याचा आरोप तक्रारदार प्रकाश म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश वानखेडे यांनी केला आहे. तक्रारदारांनी प्रशासनाला २७ मेपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत दिली आहे. निर्धारित मुदतीत अहवाल न आल्यास ३ जूनपर्यंत पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा गंभीर इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच या घटनेची जबाबदारी गटविकास अधिकारी माधवराव पायघन, चौकशी अधिकारी प्रवीण सोनवणे, ग्रामसेविका शुभांगी धोटकर आणि सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्यावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे संग्रामपूर तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, चौकशी अहवालातून नेमके काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

“दोन अधिकृत पत्रांमध्ये वेगवेगळी माहिती समोर येत असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटते. चौकशीचा अहवाल वेळेत जाहीर झाला नाही तर पुढे होणाऱ्या आंदोलनासाठी संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश वानखेडे यांनी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!