(मतीन शेख)
बुलढाणा: पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गाच्या कुशीत पक्ष्यांची लगबग वाढली असून, अंबाबरवा अभयारण्यात सुगरण (Baya Weaver) पक्ष्याने घरटे विणण्यास सुरुवात केली आहे. आपल्या कौशल्यपूर्ण विणकामासाठी प्रसिद्ध असलेला सुगरण पक्षी आपल्या घरट्याच्या रचनेतून निसर्गातील अद्भुत अभियांत्रिकीचे दर्शन घडवतो. सुगरणचे शास्त्रीय नाव Ploceus philippinus असून हा पक्षी साधारण चिमणीएवढा, सुमारे १५ सेंमी आकाराचा असतो. धान्याचे दाणे, बिया तसेच प्रजनन काळात लहान कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. विशेष म्हणजे, घरटे विणण्याचे काम प्रामुख्याने नर सुगरण करतो. अर्धवट तयार झालेले घरटे मादीची पसंती मिळाल्यानंतरच पुढील बांधकामाला वेग येतो. घरटे बांधण्यासाठी नर सुगरण पाण्याच्या वर झुकलेल्या किंवा बाभूळ, खजूर, नारळ यांसारख्या झाडांच्या टोकाच्या फांद्यांची निवड करतो. अशा ठिकाणी घरटे लटकत असल्याने साप, खार किंवा इतर भक्षकांपासून पिलांचे संरक्षण होण्यास मदत होते. घरट्यासाठी सुगरण लांब, बारीक आणि लवचिक गवताच्या काड्या तसेच पानांच्या पट्ट्या वापरतो. चोच आणि पायांच्या साहाय्याने तो या काड्या फांदीभोवती घट्ट गुंफत घरट्याचा पाया तयार करतो. त्यानंतर हळूहळू विणकाम वाढवत घरट्याला वैशिष्ट्यपूर्ण लोंबत्या आकाराचे स्वरूप दिले जाते. ताज्या आणि लवचिक गवताचा वापर केल्यामुळे विणकाम अधिक घट्ट बसते. घरटे पूर्ण होताना त्याला मजबूत, बंदिस्त रचना प्राप्त होते. त्याची रचना वारा आणि पावसाचा सामना करण्यास अनुकूल असते. घरटे अर्धवट तयार झाल्यानंतर मादी सुगरण त्याची पाहणी करते. घरट्याची मजबुती, रचना आणि जागा पसंत पडल्यास ती नराला जोडीदार म्हणून स्वीकारते. पसंती न मिळाल्यास नराला पुन्हा नव्याने घरटे विणण्याची वेळ येऊ शकते. जोडी जमल्यानंतर नर घरट्याचा खालचा भाग पूर्ण करतो. घरट्याच्या खाली नळीसारखा अरुंद प्रवेशमार्ग तयार केला जातो. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे घरट्यातील अंडी आणि पिलांना भक्षकांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. निसर्गाने दिलेली बुद्धिमत्ता, चोच-पायांचा अचूक वापर आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर सुगरण पक्षी कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय मजबूत आणि सुरक्षित घरटे उभारतो. त्यामुळेच सुगरणला पक्षीजगतामधील ‘इंजिनियर पक्षी’ म्हणून ओळखले जाते. अंबाबरवा अभयारण्यात सुरू झालेली ही घरटेनिर्मिती निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.