(मतीन शेख)
संग्रामपूर : तामगाव पोलिसांनी शेवगा फाटा परिसरात कारवाई करत बनावट नोटांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या संशयावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेवगा फाटा येथे संशयित चारचाकी वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातील व्यक्तींकडे भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या तीन नोटा, तसेच ‘भारतीय बच्चों का बैंक’ असा उल्लेख असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे १६ बंडल आढळून आले. या बनावट नोटांची किंमत ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमपी ०९ बीएल ४९१०) जप्त केली. वाहनाची अंदाजे किंमत चार लाख रुपये असून, रोख नोटांसह एकूण ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ६२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी म्हणून हुसेन अब्बास मिर्झा वय ३५ रा.टुनकी, ता.संग्रामपूर, हरर्जीदर सिंह देवेंद्रसिंह कपूर वय ५० रा. सनावद, जि. खरगोन मध्य प्रदेश, संजय बावरिया सिटोले वय ३२ रा.रमाणा ता.बडवाह, जि. खरगोन मध्य प्रदेश आणि लोकेंद्रसिंह बलवंतसिंह सोलंकी वय ६२ रा.सनावद, जि. खरगोन मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जप्त मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.