(मतीन शेख)
संग्रामपूर : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी संग्रामपूर सेवा सोसायटी मतदारसंघात आज, रविवारी २३ ऑगस्ट अतितटीच्या वातावरणात मतदान पार पडले. संग्रामपूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या मतदान प्रक्रियेत २६ प्रतिनिधी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, अनुभवी सहकार नेते विश्वनाथ झाडोकार आणि युवा उमेदवार श्रीकांत मारोडे यांच्यातील लढतीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याची उत्सुकता आहे. संग्रामपूर सेवा सोसायटी मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. प्रारंभी विश्वनाथ झाडोकार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, श्रीकांत मारोडे यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीचे चित्र बदलले. आमदार डॉ.संजय कुटे यांच्या वतीने मारोडे यांच्या उमेदवारी अर्जाला शिफारस मिळाल्यानंतर त्यांना सहकार पॅनलकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता संपुष्टात येऊन झाडोकार आणि मारोडे यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली. विश्वनाथ झाडोकार हे संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि विविध संस्थांमधील संपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. दुसरीकडे श्रीकांत मारोडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक असून युवा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली. त्यामुळे एकीकडे अनुभव, तर दुसरीकडे युवा नेतृत्व, अशी या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत सुभाष चांदुरकार हे तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यामुळे तिसऱ्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांचा अंतिम निकालावर किती परिणाम होतो, हे उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात केवळ २६ प्रतिनिधी मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मतदारसंख्या कमी असल्यामुळे अल्प मताधिक्यानेही निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या मतदानाकडे उमेदवारांसह सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात असले, तरी दोन्ही बाजूंमध्ये चुरशीची लढत झाल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीत कोणाच्या बाजूने कौल लागतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता असलेल्या या जागेवर अखेर थेट दुरंगी लढत झाली. आजच्या मतदानाने निवडणुकीचा टप्पा पूर्ण झाला असून आता उद्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे. विश्वनाथ झाडोकारांचा सहकार क्षेत्रातील अनुभव वरचढ ठरणार की श्रीकांत मारोडेंचा युवा जोश बाजी मारणार, याचा फैसला उद्या होणार आहे. अवघे २६ प्रतिनिधी मतदार, तीन उमेदवार आणि दोन प्रमुख दावेदार यामुळे संग्रामपूर सेवा सोसायटी मतदारसंघातील निकालाकडे संग्रामपूरसह जिल्ह्याचे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.