(मतीन शेख)
बुलढाणा: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या कामगिरीसोबतच पंचांच्या निर्णयक्षमतेलाही अनन्यसाधारण महत्त्व असते. या पंचगिरीच्या क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्यातील जळगावचे निजामोद्दीन सैय्यद यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेट पॅनल अंपायर परीक्षेत त्यांनी यश मिळवत राज्यस्तरीय पंच म्हणून आपल्या कारकिर्दीची नवी सुरुवात केली आहे. (VCA) स्टेट पॅनल अंपायर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर १३ ते २१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच विनीत कुलकर्णी आणि अभिजित देशमुख यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. क्रिकेटच्या नियमांचा सखोल अभ्यास, पंचगिरीतील तांत्रिक बाबी, मैदानावरील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष सामन्यातील विविध प्रसंग याबाबत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेनंतर घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षेत निजामोद्दीन सैय्यद यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. दोन्ही परीक्षांमध्ये प्रभावी कामगिरी करत त्यांनी स्टेट पॅनल अंपायर म्हणून पात्रता मिळवली. निजामोद्दीन सैय्यद यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, क्रिकेटच्या नियमांचा सखोल अभ्यास आणि पंचगिरीची असलेली विशेष आवड महत्त्वाची ठरली. मैदानावरील प्रत्येक परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी विकसित केली असून, त्याचेच फलित म्हणून हे यश मिळाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. उच्चस्तरीय पंचगिरीच्या दिशेने वाटचाल VCA स्टेट पॅनलमध्ये स्थान मिळाल्याने सैय्यद यांच्या पंचगिरीच्या कारकिर्दीला मोठी चालना मिळाली आहे. राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळणार असून, भविष्यात उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या यशामुळे बळ मिळाले आहे. निजामोद्दीन सैय्यद यांच्या यशाबद्दल जळगावमधील क्रिकेटपटू, पंच, प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि क्रिकेटप्रेमींनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जळगावच्या क्रिकेट क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.