Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedसंग्रामपूर तालुक्यावर शोककळा : राजेंद्र ठाकरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

संग्रामपूर तालुक्यावर शोककळा : राजेंद्र ठाकरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

(मतीन शेख)

 

संग्रामपूर: बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक सक्रिय व प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ठाकरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमरावती येथे उपचारादरम्यान निधन झाले. मध्यरात्रीच्या सुमारास ब्लॉकेज काढण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात निष्ठा, कार्यात सातत्य आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध यासाठी ओळखले जाणारे ठाकरे पाटील यांनी भाजपमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते माजी तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा उपाध्यक्ष राहिले असून, बावनबीर सर्कलमधून सलग दोनदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली. त्यांच्या कार्यकाळात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्यात आले. सध्या ते संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत होते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. स्वभावाने विनम्र, पण कामात ठाम असलेले ठाकरे पाटील हे आमदार डॉ.संजय कुटे यांचे विश्वासू सहकारी मानले जात. संग्रामपूर तालुक्यातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत असे. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. कुटुंबीय, सहकारी आणि नागरिक यांच्यात दुःखाची भावना पसरली आहे. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता वडगांव वाण ता. संग्रामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात वडील पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ आणि मोठा चाहता वर्ग आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!