Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedई-गव्हर्नन्समध्ये अकोला पोलिसांची झेप; राज्यात तिसरा क्रमांक

ई-गव्हर्नन्समध्ये अकोला पोलिसांची झेप; राज्यात तिसरा क्रमांक

(मतीन शेख)

 

मुंबई: डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेल्या पावलांना अकोला पोलिसांनी उल्लेखनीय यशाची जोड दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या “१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रम” अंतर्गत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत आपली कार्यक्षमता सिद्ध केली. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा गौरव करण्यात आला. मुंबईत झालेल्या विशेष समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यातील ३४ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये दोन टप्प्यांत मूल्यांकन प्रक्रिया पार पडली. यात कार्यालयाचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच GIS प्रणाली या सात निकषांचा समावेश होता. अकोला कार्यालयाने या सर्वच बाबींमध्ये प्रभावी अंमलबजावणी करत आघाडी घेतली. या गौरव समारंभात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रशस्तिपत्र देण्यात आले. या यशामुळे अकोला पोलिसांच्या डिजिटल उपक्रमांना नवी दिशा मिळणार असून नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात अकोल्याने मिळवलेले हे स्थान जिल्ह्यासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!