(मतीन शेख)
अकोला: स्थानिक गुन्हे शाखा व बाळापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेलदारपुरा परिसरात धाड टाकून तब्बल ११२.०९ किलो गांजासह सुमारे ५५ लाख ७८ हजार ०५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ही कारवाई “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत करण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आज ८ एप्रिल स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पथकाला बेलदारपुरा भागात काही व्यक्ती वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या समन्वयाने संयुक्त पथकाने नियोजनबद्ध छापा टाकला. पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता एका घरासमोर ट्रक एमएच ३० बिडी ३१३० व पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर एमएच ०५ बीए १०१० उभी असल्याचे दिसून आले. पंच व राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन्ही वाहनांची झडती घेतली असता फॉर्च्यूनरमध्ये एक पोते आणि ट्रकमध्ये दोन पोती अशा एकूण ११२.०९ किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजार किंमत सुमारे २५ लाख ७८ हजार ०५७ रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेली ट्रक अंदाजे २० लाख रुपये व फॉर्च्यूनर कार अंदाजे १० लाख रुपये असा एकूण ५५ लाख ७८ हजार ०५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सीलबंद करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद असलम मो. आजम वय ४९ व मोहम्मद अजमल मो. आजम वय ४२ दोघेही रा. बेलदारपुरा बाळापूर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गांजा साठवून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश झोडगे, उपनिरीक्षक गोपाल जाधव, नयन पाटील, शरद सैदाने, संभाजी हिवाळे, माधुरी पाटील तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.