Sunday, September 20, 2026
HomeUncategorizedराष्ट्रीय नेतृत्वाच्या पटलावर संग्रामपूरचा युवा चेहरा; अभयसिंह मारोडे यांची ‘द गुड पॉलिटिशियन...

राष्ट्रीय नेतृत्वाच्या पटलावर संग्रामपूरचा युवा चेहरा; अभयसिंह मारोडे यांची ‘द गुड पॉलिटिशियन २०२६’साठी निवड

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : तळागाळातील सामाजिक आणि लोकशाहीवादी कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील युवा नेतृत्व अभयसिंह मनोहर मारोडे यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी (ISD) आयोजित ‘द गुड पॉलिटिशियन २०२६’ या राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या केवळ ५० युवा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश असून, संपूर्ण विदर्भातून यंदा निवड झालेले ते एकमेव युवा नेतृत्व ठरले आहेत. अभयसिंह मारोडे हे कृषी उत्पन्न बाजार समिती, संग्रामपूरचे विद्यमान संचालक असून, त्यांनी पळशी झाशीचे सरपंच म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक प्रश्नांवरील सक्रिय भूमिका, युवकांचे संघटन आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

 

तीन महिन्यांच्या कठीण निवड प्रक्रियेनंतर यश

‘द गुड पॉलिटिशियन २०२६’ या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले होते. निवड प्रक्रियेत ऑनलाइन लेख सादरीकरण, व्हिडिओ मुलाखत आणि दोन दिवसीय निवासी बूट कॅम्प अशा विविध टप्प्यांतून उमेदवारांची क्षमता तपासण्यात आली. जवळपास तीन महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर अंतिम ५० युवा नेत्यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे ग्रामीण भागातून सामाजिक व सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या युवा नेतृत्वाला राष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळाले आहे.

नेतृत्व विकासासाठी नऊ महिन्यांचे प्रशिक्षण

निवड झालेल्या युवा नेत्यांसाठी नऊ महिन्यांचा नेतृत्व विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये, सार्वजनिक धोरणे, निवडणूक प्रक्रिया, जनसंवाद, संघटन उभारणी, निवडणूक नियोजन, धोरणनिर्मिती आणि प्रभावी नेतृत्व यांसह विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशाच्या विविध भागांत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या युवा नेतृत्वाशी संवाद साधण्याची तसेच त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी युवकांना मिळणार आहे.

 

सामाजिक कार्यातून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत

अभयसिंह मारोडे यांनी यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे माजी प्रवक्ते म्हणून कार्य केले आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. मानवता, समता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, शिक्षण, युवकांचे संघटन तसेच वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व लोकशाहीवादी कार्याची दखल घेत इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसीने त्यांची या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड केली आहे. मारोडे यांच्या निवडीमुळे संग्रामपूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या युवा आणि सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!