Sunday, September 20, 2026
HomeUncategorizedनांदेड हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा! इंद्रजीतसिंग बावरी कुटुंबाला न्याय देण्याची...

नांदेड हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा! इंद्रजीतसिंग बावरी कुटुंबाला न्याय देण्याची एएसएची मागणी

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : नांदेड येथील इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेमागील संपूर्ण सत्य उजेडात आणावे, यासाठी ऑल सिख-सिकलीगर असोसिएशनने (एएसए) राज्य शासनाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात स्वतंत्र विशेष तपास पथक (एआयटी) नियुक्त करून तपास करावा, तसेच दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एएसएच्या पदाधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी तहसीलदार, तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले. या निवेदनात इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्येचा तपास पारदर्शक पद्धतीने करून प्रकरणातील प्रत्येक आरोपीची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, एएसएचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीतसिंग बावरी यांचे पुत्र इंद्रजीतसिंग बावरी यांची ८ ऑगस्ट रोजी नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील खुलेआम पेट्रोल पंपाजवळ भरदिवसा हत्या झाली. या घटनेनंतर बावरी कुटुंबीय तसेच समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या हत्येमागे पूर्वनियोजित कट होता का, गुन्हेगारी टोळीचा सहभाग आहे का किंवा अन्य व्यक्तींची भूमिका आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे एएसएने निवेदनात म्हटले आहे. प्रकरणातील आरोपींविरुद्ध कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच आरोपींच्या भूमिकेनुसार भारतीय न्याय संहिता (बिएनएस) मधील कलम ३(५) आणि इतर लागू तरतुदींचा वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे. हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासनाने न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी पाठपुरावा करावा, असेही एएसएने म्हटले आहे. इंद्रजीतसिंग बावरी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि हत्येचा तपास कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्षपणे व्हावा, यासाठी संबंधित पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक निर्देश देण्याची मागणी संघटनेने केली आहे. आता एएसएच्या निवेदनाची शासन आणि पोलीस प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!