(मतीन शेख)
बुलढाणा : मुस्लीम बांधवांचा पवित्र ईद-उल-अजहा (बकरी ईद) सण गुरुवार २८ मे रोजी शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी सोनाळा पोलिस स्टेशनतर्फे आज बुधवार दि.२७ मे रोजी बावनबीर व सोनाळा परिसरात भव्य पथसंचलन करण्यात आले. सोनाळा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजेदरम्यान हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये एक अधिकारी, १२ पोलिस अंमलदार तसेच २० होमगार्ड सहभागी झाले होते. पाण्याची टाकी परिसर, ताज नगर, अग्रसेन मार्ग, सोनाजी महाराज मंदिर तसेच गौमाता मंदिर परिसरातून पथसंचलन करण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, सर्वधर्मीय नागरिकांनी शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखून सण साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार संदीप काळे यांनी यावेळी केले. ईद-उल-अजहाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.