(मतीन शेख)
बुलढाणा: मुलींमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या ‘मिशन परिवर्तन’ उपक्रमांतर्गत संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने टुणकी व सोनाळा येथील संत सोनाजी महाराज विद्यालय आणि जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत जनजागृती कार्यक्रम आज दि.७ ऑगस्ट रोजी राबवण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांना दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. छेडछाड, पाठलाग (स्टॉकिंग), सोशल मीडियावरील फसवणूक, सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार, ‘गुड टच-बॅड टच’ तसेच ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या त्रासाला बळी न पडता त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महिला हेल्पलाईन १०९१ आणि आपत्कालीन सेवा ११२ या क्रमांकांची माहितीही विद्यार्थिनींना देण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. दामिनी पथकाने त्यांच्या शंकांचे समाधान करून स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे, आत्मविश्वासाने वागणे आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्याचा संदेश दिला. बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मिशन परिवर्तन’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये आणि मुलींमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करणे, पोलिसांबद्दल विश्वास दृढ करणे आणि सुरक्षित, भयमुक्त समाज घडविणे हा आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभर सातत्याने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सोनाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख महिला पोलीस हवालदार प्राजक्ता चिमकर, महिला पोलीस अर्चना मते तसेच पोलीस कर्मचारी राहुल पवार, संदीप सुसर आणि इमरान शेख यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अशा जनजागृती कार्यक्रमांसह नियमित पोलीस गस्त सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.