(मतीन शेख)
संग्रामपूर : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमित्रावहिनी पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने गुरूवारी तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निषेध निवेदन देण्यात आले. या निवेदनात महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे हे राज्याच्या सांस्कृतिक परंपरेला आणि लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला लोकप्रतिनिधींविषयी अशा प्रकारची विधाने समाजात चुकीचा संदेश देणारी असून त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर वाटचाल करणारा पक्ष असल्याचे नमूद करण्यात आले. महिला सन्मान, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय ही पक्षाची प्रमुख भूमिका असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अवमानकारक वक्तव्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र घिवे पाटील, शहराध्यक्ष राजेश गिरी, युवक शहराध्यक्ष अक्षय सिरशोले, तालुकाध्यक्ष (अ.) कलीम शेख, जिल्हा सचिव साबीर शेख, अक्षय पाटील घिवे, सचिन दाते, स्वप्निल मख, पिंटू दाभाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.