(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर, टुनकी आणि सोनाळा परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनाळा शिवार आणि टुनकी शिवार येथे अवघ्या दोन दिवसांत हरिण व काळविट या दोन प्राण्यांचा संशयित बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च रोजी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाळा शिवारात विजय भगत यांच्या शेत परिसरात प्रथम हरिण मृतावस्थेत आढळले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी टुनकी शिवारात राहुल पुंडे यांच्या शेतात काळविट मृत अवस्थेत दिसून आला. या सलग घटनांमुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, शेतात काम करताना जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सायंकाळनंतर व रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीती अधिक वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत माहिती देण्यासाठी वन विभाग अधिकारी निलेश काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.