(मतीन शेख)
संग्रामपूर : तालुक्यात १९ मार्च रोजी अचानक झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, मका, कांदा यांसह संत्रा पिकालाही या आपत्तीचा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके आडवी पडून जमीनदोस्त झाली आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सततच्या नापिकीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नव्या संकटाने आणखीच ताण वाढवला आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. बावनबीर, टुनकी, लाडनापूर, सोनाळा, पळशी झाशी, पातुर्डा तसेच इतर गावांमध्ये या वादळ-पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये उभी पिके कोसळल्याने नुकसानाचे प्रमाण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.