(मतीन शेख)
बुलढाणा: जळगाव जामोद शहरात बिबट्याच्या वावराची घटना समोर आल्यानंतर प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सिद्धिविनायक नगर परिसरात, आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानाजवळ तसेच महात्मा फुले कन्या शाळा परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्टपणे दिसून आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस, महसूल आणि नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून शहरातील संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पहाटे व रात्रीच्या वेळेत घराबाहेर (मॉर्निंग वॉक) पडणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि घर परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम व सतर्कता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.