(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पोलीस ठाण्यांमध्ये सततच्या फेऱ्या टाळण्यासाठी आणि शासकीय कामकाज सुलभ करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरून आता पोलीस विभागाच्या १२ हून अधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून थेट अर्ज करता येणार आहे. वेळ आणि श्रम वाचवणाऱ्या या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नागरिकांना केले आहे. ध्वनिक्षेपक परवानगी, सभा, मिरवणूक व शोभायात्रांसाठी परवाने, मनोरंजन कार्यक्रमासाठी परवाना, विदेशी कलाकार सहभागी होणाऱ्या कार्यक्रमासाठी परवानगी, चित्रपटगृह परवाना व त्याचे नूतनीकरण, नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, परदेशात शिक्षण/नोकरीसाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र, टिकाऊ वस्तू देशात परत नेण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक करमणूक व मेळाव्यांचे परवाने व त्यांचे नूतनीकरण ह्या सर्व प्रमुख सेवा ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्जदार म्हणून नोंदणी करून पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करून ऑनलाइन अर्ज सादर करता येतो. सेवा मिळविण्यासाठी थेट आपले सरकार पोर्टल ला भेट द्या किंवा QR कोड स्कॅन करून त्वरित प्रवेश मिळवा अशे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा पोलिसांचा हा उपक्रम ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला चालना देणारा असून, शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता व गती निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.