Sunday, November 22, 2026
Homeनेशनल न्यूज़“सामाजिक ऐक्य हीच खरी ताकद" बावनबीर भेटीत आमदार साजिद पठान यांचे वक्तव्य;...

“सामाजिक ऐक्य हीच खरी ताकद” बावनबीर भेटीत आमदार साजिद पठान यांचे वक्तव्य; दोषींवर कठोर कारवाई, निष्पापांवर अन्याय होऊ नये, गावात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन

 

(मतीन शेख)

 

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे काही दिवसांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठान यांनी गुरुवार (९ ऑक्टोबर) रोजी गावाला भेट देऊन दोन्ही समाजातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीचा उद्देश गावात शांतता, सामाजिक ऐक्य आणि परस्पर विश्वास पुनर्स्थापित करणे हा होता. “सामाजिक ऐक्य हीच खरी ताकद आहे. गावात भीती नव्हे, तर विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. नागरिकांनी संयम राखल्यास अशा घटना पुन्हा घडणार नाही,” असे आमदार पठान यांनी स्पष्ट सांगितलं. यावेळी जेष्ठ समाजसेवक मुफ्ती अशपाक कासमी साहेब, अकोला राष्ट्रवादीचे नेते जावेद जकरीया, संग्रामपूर बाजार समितीचे संचालक राजेंद्र वानखडे, संग्रामपूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश टाकळकार, काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय ढगे, बावनबीरचे उपसरपंच नजीर भाई, हाफिज जमीर खान साहेब, सोनाळा ग्रामपंचायत सदस्य अफरोज भाई, जलील सर, तौसिफ जमदार, विनायक काळमेघ, सलमान कुरेशी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी दुर्गादेवी मिरवणुकीदरम्यान झालेल्या पथरावामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार साजिद पठान यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सोनाळा पोलिस ठाण्यात ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आणि पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आमदार पठान यांनी स्पष्ट केले की, “दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, परंतु निष्पाप नागरिकांवर अन्याय होऊ नये, याचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.” दरम्यान, शेगांव पोलीस स्टेशनमध्ये आमदार साजिद खान पठान यांनी अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची भेट घेऊन बावनबीर दगडफेक प्रकरणाबाबत दोषींवर योग्य कारवाई होण्याची मागणी केली आणि निष्पापांवर कारवाई होऊ नये यावर भर दिला. आमदार पठान यांनी गावातील दोन्ही समाजातील बांधवांशी संवाद साधून शांतता, सौहार्द आणि एकतेचे आवाहन केले. “अफवांवर विश्वास ठेवू नका, परस्पर संवाद आणि विश्वास ठेवा. शांततेतूनच प्रगतीचा मार्ग निघतो,” असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!