(मतीन शेख)
बुलढाणा : आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांना शाहाबाद येथील टोल नाक्यावर अडवून कथितरित्या करण्यात आलेल्या हल्ल्याची निष्पक्ष, उच्चस्तरीय व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आले. विद्यमान खासदारावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब असून, या घटनेची केवळ प्राथमिक चौकशी न करता हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम तपासण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कायद्यानुसार तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या घटनेमागे कोणाचा दबाव, कटकारस्थान किंवा सूत्रधार आहे का, याचाही सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली. खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने आढावा घेऊन त्यांना Z+ सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही बांगर यांनी केली. लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि राजकीय अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आजाद समाज पार्टीतर्फे लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी पंकज शेगोकार, शेख आबेद, महादेव जाधव, विजय इंगळे, सागर मोरे, सिद्धांत तायडे, सोपान दाभाडे, अभिजीत कांबळे, संदेश वानखडे आदी कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.