(मतीन शेख)
बुलढाणा : वनविभागाकडून पुनर्वसनासाठी मिळालेल्या घराच्या मोबदल्यातील रक्कम काढून घेत ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी रोहिणखिडकी शेंबा, ता. संग्रामपूर येथील ३४ वर्षीय महिलेने सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, वनविभागाकडून पुनर्वसन झाल्याने फिर्यादीला घराच्या मोबदल्यापोटी २ लाख ३४ हजार रुपये, तर गावातील सूरज बळीराम जामुनकर यांना १ लाख २६ हजार रुपये मिळाले होते. दरम्यान, आरोपी सागरसींग अमरसींग चव्हाण व यशपालसिंग कर्तारसींग जुनी, दोघेही रा. निमखेडी, यांनी नावात दुरुस्ती करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी फिर्यादी व सूरज जामुनकर यांचे आधारकार्ड, फिर्यादीच्या पतीचा मृत्यू दाखला, पॅनकार्ड, आठ-अ उतारा, महाराष्ट्र बँक, बावणबीर शाखेच्या खात्याचे पासबुक, फोटो तसेच काही कागदपत्रांवर अंगठे घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कागदपत्रांचा गैरवापर करून दोघांच्या बँक खात्यांतून एकूण ३ लाख ६० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून सोनाळा पोलीस ठाण्यात दखलपात्र अहवाल क्र. २४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोहेकॉ शाकीर पटेल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार व संजय सास्ते हे पुढील तपास करीत आहेत.