(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यात घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून तब्बल ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना पळशी झाशी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान तामगाव पोलिसांसमोर आहे. पळशी झाशी येथील कैलास श्रीकृष्ण मारोडे हे १९ ऑगस्ट रोजी रात्री घराबाहेर होते. रात्रीचे ९ ते २० ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराला लक्ष्य केले. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने दोन लोखंडी अलमारींचे लॉकर फोडले. अलमारीतील सुमारे १९१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ५ लाख ३४ हजार ८०० रुपये, तर चांदीच्या दागिन्यांची किंमत १० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगड्या, सोन्याच्या पोती, चैन, अंगठ्या, कानातील दागिने, महालक्ष्मीचा सोन्याचा सिक्का तसेच विविध लॉकेट व भेटवस्तूंचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कैलास मारोडे यांनी तामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध क्रमांक २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ करीत असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.