Friday, September 18, 2026
HomeUncategorizedदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या दारी आरोग्यसेवा; वसाळीत मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या दारी आरोग्यसेवा; वसाळीत मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

(मतीन शेख)

 

बुलढाणा: शहरांमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधा दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वसाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण जाणाऱ्या गरजू रुग्णांसाठी हे शिबिर विशेष दिलासादायक ठरले. या उपक्रमाला आमदार संजय कुटे आणि भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत तज्ज्ञ वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता आला. शिबिरात समर्पण हॉस्पिटल, वत्सल हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, नुरॉन हॉस्पिटल, सोलार हॉस्पिटल आणि मेडिकेअर हॉस्पिटल, अकोला येथील वैद्यकीय पथकांनी सहभाग घेतला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार, पुढील तपासण्या आणि आरोग्यविषयक काळजीबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय समन्वयक सुनील रामदास सुरतने यांनी उपस्थित आशा सेविकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणती प्रक्रिया राबवावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्यसेवा थेट गावाच्या दारी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि विविध तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने वेळ व खर्चाची बचत झाली. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका तसेच सहभागी रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!