Tuesday, April 14, 2026
Homeनेशनल न्यूज़ज्येष्ठ पत्रकार केशवराव घाटे (अण्णा) यांचे निधन; पत्रकारिता व समाजसेवा क्षेत्रात शोककळा

ज्येष्ठ पत्रकार केशवराव घाटे (अण्णा) यांचे निधन; पत्रकारिता व समाजसेवा क्षेत्रात शोककळा

 

(मतीन शेख)

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमी केशवराव घाटे (अण्णा) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक निडर, सचोटीचा व लोकाभिमुख आवाज कायमचा शांत झाला आहे.

केशव घाटे हे नाव संग्रामपूर तालुक्यातील प्रत्येक वंचित घटकाला परिचित होते. साधा पायजमा, शर्ट आणि टोपी परिधान करून संपूर्ण तालुक्यात वृत्तपत्र घराघरांत पोहोचवत, त्या माध्यमातून मिळणाऱ्या अल्प कमिशनवर त्यांनी आपले चरितार्थ चालविले. पण त्या सोबतच त्यांनी गोरगरीब, शेतकरी व वंचित समाजघटकांची कामे निस्वार्थ भावनेने केली.

अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी प्रशासनाशी वाद घालण्यासही कधीच मागेपुढे पाहिले नाही. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच त्यांचे आयुष्याचे ब्रीद होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते नेहमी अग्रभागी राहिले आणि शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला.

पर्यावरणाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. सामाजिक वनीकरण विभागात रोजंदारीवर काम करत असताना त्यांनी हजारो वृक्ष लावून जगविले. खरा ‘वृक्षमित्र’ म्हणून त्यांनी समाजात आदर्श निर्माण केला.

आयुष्याच्या उत्तरार्धात तब्येत साथ देत नसतानाही त्यांनी आपले वृत्तपत्र कार्य अखेरपर्यंत सुरू ठेवले. त्यांचा अखंड परिश्रम, निष्ठा आणि समाजासाठीची झटपट वृत्ती सर्व पत्रकार बांधवांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

आज त्यांच्या जाण्याने संग्रामपूर तालुका हळहळला असून त्यांच्या वृत्तपत्राचा आवाज आता गावोगावी ऐकू येणार नाही, याची खंत सर्वांना आहे.

त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उद्या दिनांक २५ ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी ११.०० वाजता पळशी येथे पार पडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!