(मतीन शेख)
पानी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६’ अंतर्गत मंगळवार, दि. २६ मे रोजी कुंदेगाव येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळेत गटशेती व स्थानिक शेतकरी संवाद मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. ‘सारे एकत्र येऊया – कीडमुक्त शिवार करूया’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन कुंदेगाव येथील ‘राजे छत्रपती शेतकरी गट’ व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गटाचे निमंत्रक नागसेन वानखडे यांनी केले, तर प्रास्ताविक पानी फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी ब्रम्हदेव गिऱ्हे यांनी करून स्पर्धेचे महत्त्व विशद केले. मेळाव्याचे उद्घाटन संग्रामपूर खरेदी-विक्री संघाचे संचालक संजय वाकळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. अ.तु. गाभणे यांनी शेतकऱ्यांना पिकांवरील रोगराई व कीड व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, संग्रामपूरचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘राजे छत्रपती शेतकरी गटाचे’ अध्यक्ष डिगांबर खोंड होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा गट मेंटोर देशमुख, पानी फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी सुभाष गवई व साक्षी राऊत, मंडळ कृषी अधिकारी राहाटे मॅडम, उपकृषी अधिकारी आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी वाघ व भोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. टाकळी पंच ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मीबाई बाबुराव सुलताने तसेच माजी सरपंच सुनील मेहेंगे यांनीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली.
महिला शेतकरी गटांचा उल्लेखनीय सहभाग
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे महिला शेतकरी गटांचा सक्रिय सहभाग होय. कुंदेगाव येथील ‘एकता महिला शेतकरी गट’ तसेच उकळी बु. येथील ‘सिद्धार्थ महिला शेतकरी गट’ यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गटशेतीतील महिलांची भूमिका अधोरेखित केली. यावेळी सलग तीन वर्षे नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून विक्रमी उत्पादन घेणारे कुंदेगावचे शेतकरी विनायक खोंड यांचा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू कवडकर, शिवहरी खोंड, जितेंद्र वानखडे, दिलीप लोणाग्रे, पुरुषोत्तम साबे, सुरज लोणाग्रे, जीवन वानखडे यांच्यासह कुंदेगावातील समस्त शेतकरी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी गजानन साबे यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांचे आभार मानले. कीडमुक्त शिवाराचा संकल्प करत उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.