Friday, June 5, 2026
HomeUncategorized“एक कॉल, प्रॉब्लेम सॉल” या संकल्पनेची यशस्वी कामगिरी: विकासाच्या बळावर पळशी झाशी...

“एक कॉल, प्रॉब्लेम सॉल” या संकल्पनेची यशस्वी कामगिरी: विकासाच्या बळावर पळशी झाशी ग्रामपंचायतीची तालुक्यात अव्वल झेप

(मतीन शेख)

 

संग्रामपूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी (झाशी) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट नियोजन, लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण विकासकामांच्या जोरावर ग्रामपंचायतीने १५ लाख रुपयांच्या बक्षिसावर आपले नाव कोरले. सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकासकामांना गती मिळाली. “एक कॉल, प्रॉब्लेम सॉल” या संकल्पनेतून ग्रामस्थांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालयातील ऑनलाइन सेवा, शाळांमधील सुविधा, अंगणवाड्यांमधील उपक्रम, व्यायामशाळा आणि वाचनालय विकास यावर विशेष भर देण्यात आला. गावातील सार्वजनिक ठिकाणांची रंगरंगोटी, जनावरांसाठी पाण्याचे हौद, सर्व धर्मीयांना समान न्याय देणारे उपक्रम आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेली कामे यामुळे ग्रामपंचायतीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांनी यापूर्वीही राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल विविध सामाजिक संस्था तसेच शासकीय स्तरावर घेण्यात आली आहे. या यशाबद्दल सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माधव पायघन, ग्रामसेवक हेमंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पत्रकार बांधव आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. “गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी दिलेली साथ हीच आमची खरी ताकद आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!