(मतीन शेख)
अकोला : बाळापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी असलेला पवन वडगावे या पोलीस शिपायाला अकोला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. तब्बल ३० दिवस विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीनेच्या नातेवाईकानी आरोपी पोलीस शिपायाविरुद्ध प्रेमसंबंधाच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच लग्नास नकार दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. तो पोलीस दलात कार्यरत असल्याने तपासाची माहिती व हालचालींची जाण असल्यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधपथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि आरोपीच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष ठेवून सलग ३० दिवस शोधमोहीम राबविली. या काळात हैदराबाद, कोयंबतूर, बेंगळुरू, मुंबई, हिंगोली आणि नांदेड येथे आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यातील मारताडा ता. नायगाव येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हारकर, बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

