(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे कैलास मारोडे यांच्या घरात झालेल्या जबरी चोरीच्या घटनेला आठवडा उलटूनही चोरट्यांचा माग लागला नसल्याने पळशी झाशी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. चोरीचा तातडीने तपास करून आरोपींना अटक न केल्यास तामगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेऊन पोलिसांकडे आज दि.२५ ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले आहे. १९ ऑगस्टच्या रात्री गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या कैलास मारोडे यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख १ लाख रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घरफोडीची ही घटना समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र आठवडा उलटूनही तपासाला ठोस दिशा मिळालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, आरोपींना जेरबंद करावे तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने याप्रकरणी ठराव करून तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला आहे. तसेच ग्रामस्थांचे निवेदन तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांना देण्यात आले. “चोरीचा तपास लवकरात लवकर न लागल्यास तामगाव पोलीस ठाण्यासमोर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे या चोरीच्या तपासाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.