(मतीन शेख)
अकोला : वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावत अकोट शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या ८ दुचाकी, २ इंजिन व इतर साहित्य असा एकूण ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अकोट शहर व परिसरातील वाहन चोरीच्या आणखी घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. गजानन प्रभूदास रायबोले वय २३ आणि अब्दुल जावेद अब्दुल जमील जमदार वय ३० दोघेही रा. इंदिरा नगर येवदा जि. अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वाहन चोरीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध कंपन्यांच्या ८ दुचाकी, २ इंजिन आणि इतर साहित्य जप्त केले. या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या वाहनांचा अकोट शहर तसेच अमरावती जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींची अधिक चौकशी केली जात असून, त्यातून वाहन चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील आणि पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, पोहेकॉ नरेंद्र जाधव, रामेश्वर भगत, कपिल राठोड, नितेश सोळंके आणि सुबोध खंडारे यांचा समावेश होता. अकोट शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या प्रकरणांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, जप्त करण्यात आलेल्या वाहनांची पडताळणी करून संबंधित गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.