(मतीन शेख)
संग्रामपूर : रक्षाबंधन सणासाठी माहेरी निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय महिला आणि तिच्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातात तीन वर्षीय मुलासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी संतप्त झालेल्या नागरिकांनी बोलेरो वाहन पेटवून दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शुक्रवारी २८ ऑगस्ट दुपारी साडेतीनच्या सुमारास राज्य महामार्ग क्रमांक ४७ वरील टुनकी ते लाडणापूर मार्गावर लाडणापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. सपना संजय वास्कले वय २८ आणि त्यांची मुलगी उर्मी उर्फ पूर्वी संजय वास्कले वय १ रा. जसाँदी, ता. शाहपूर, जि. बुरहानपूर मध्य प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. सनविर संजय वास्कले वय ३ आणि कमलेश भुरा चंगळ रा. बौरवा ता.तेल्हारा जि.अकोला हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना वास्कले या रक्षाबंधन सणासाठी बोरवा येथे माहेरी जाण्यासाठी मोटारसायकलने निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ कमलेश, मुलगा सनविर, मुलगी उर्मी आणि भाची नायरा होती. लाडणापूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो क्रमांक एमपी-१२-झेडएच-९३४२ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघाताच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्याची परिस्थिती पाहता वाहन सावधपणे चालविणे अपेक्षित असताना बोलेरो चालकाने वाहन भरधाव व बेदरकारपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दोन जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी बोलेरो वाहन पेटवून दिल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा अंदाज घेत नागरिकांना शांत करून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन व घटनास्थळाची पाहणी करून पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणी हिरालाल अनारसिंग वास्कले यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक रवी गोखले याच्याविरुद्ध कायमी अप क्रमांक २५०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ व ११० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप काळे करीत आहेत.