(मतीन शेख)
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तहसीलदार प्रशांत पाटील तसेच संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील रिंगणवाडी, वानखेड, कोटेल, कोलद आणि काकनवाडा परिसरातील वाण नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या अवैध रेती उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे नदीपात्राचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले असून पर्यावरणावरही परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तसेच पेसोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात बोटी व केनी मशीनच्या सहाय्याने तर पळशी झाशी, उमरा आणि पंचाळा येथील पांडव नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने दिवसरात्र रेती व रूडीचे उत्खनन सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय आस्वंद येथील पूर्णा नदीपात्रातही बोटींच्या सहाय्याने वाळूचा उपसा सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवैध रेती वाहतुकीबाबत तहसीलदार यांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या कडून दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. म्हणूनच संबंधित नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप करून किती प्रमाणात रेतीचे उत्खनन झाले याची चौकशी करावी व संबंधित गावांतील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, सात दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा अमोल ठाकरे यांनी दिला आहे. या घटनेला प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.