(मतीन शेख)
बुलढाणा: कवठळ गावाजवळ झालेल्या एका दुचाकी अपघातामागे सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येसाठी स्वतः पतीनेच कट रचल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणात तीन जणांना समावेश आहे. २ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे पावणे ७ वाजताच्या सुमारास वृषाली प्रकाश गावंडे या दुचाकीवरून जात असताना कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ एमएच २८ बीबी ५७५३ या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत वृषाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजत होते. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासातून हा नियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले. जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित वाहनाचा माग काढत पोलिसांनी मनीष नारायणसिंग सुर्यवंशी (रा. जगदंबा नगर, शेगाव) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत मनीष सुर्यवंशी याने वृषाली गावंडे यांच्या हत्येची सुपारी घेतल्याची कबुली दिली. तपासात पुढे असेही समोर आले की, या गुन्ह्यामागे मृत महिलेचे पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्यांचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) हे मुख्य सूत्रधार आहेत. वृषाली गावंडे यांचा जीव घेण्यासाठी आरोपींनी यापूर्वी तीन वेळा अन्नातून विष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न फसल्याने शेवटी अपघाताचा बनाव रचत गाडीने धडक देऊन हत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनीष सुर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी वाहन चालक मनीष नारायणसिंग सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ६१(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत असून या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.