(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द शिवारात वान नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना वाहतूक करण्यात येत असल्याचे महसूल पथकाने उघडकीस आणले. संबंधित ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करत वाहन जप्त करण्यात आले आहे. महसूल विभागाला मिळालेल्या माहितीनुसार काकनवाडा खुर्द येथील वान नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता श्रीकृष्ण रामराव अढाव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एमएच १९ सीझेड ७८८२ एक ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक करताना आढळून आला. महसूल पथकाने घटनास्थळी पंचनामा करून वाहन मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. तसेच संबंधित ट्रॅक्टर जप्त करून तामगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार राहुल वसावे, ग्राम महसूल अधिकारी एस. एस. कुसळकर, एस. खाटोले व एस.बी. कांबळे यांच्या पथकाने केली. तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

