Friday, June 5, 2026
HomeUncategorizedवीज कपातीमुळे शेतकरी संतप्त; आठ तास वीजपुरवठा व रात्रीची सिंगल फेज सुरू...

वीज कपातीमुळे शेतकरी संतप्त; आठ तास वीजपुरवठा व रात्रीची सिंगल फेज सुरू करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

(मतीन शेख)

 

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीची धावपळ सुरू असताना शेतीपंपांसाठी मिळणारा वीजपुरवठा आठ तासांवरून सहा तासांपर्यंत कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा करावा तसेच बंद करण्यात आलेली रात्रीची सिंगल फेज तात्काळ सुरू करावी, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दि.४ जुन रोजी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. महावितरणकडून संबंधित भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा कमी करण्यात आला असताना इतर तालुक्यांमध्ये मात्र आठ तास वीजपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. खरीप पेरणीच्या निर्णायक टप्प्यावर पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील रात्रीची सिंगल फेज वीज सेवा बंद झाल्याने नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिला. या निवेदनावर शेतकरी नेते प्रकाश भिसे, शिवसेना तालुका उपप्रमुख विजय मारोडे, धनंजय पाटील अवचार, स्वप्निल मारोडे, सतीश वानखडे, दादाराव सौदागर, मंगेश मारोडे, अक्षय शिरसोले, दशरथ वानखडे, देविदास आगरकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!