Friday, June 5, 2026
HomeUncategorizedपोलिसांच्या सतर्कतेने टळला संभाव्य अनर्थ; पिस्तूल, काडतुसे व तलवारींसह तिघे जेरबंद

पोलिसांच्या सतर्कतेने टळला संभाव्य अनर्थ; पिस्तूल, काडतुसे व तलवारींसह तिघे जेरबंद

(मतीन शेख)

 

अंजनगाव सुर्जी: गंभीर गुन्हा घडविण्याच्या तयारीत असलेल्या तिघा युवकांच्या हालचालींवर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी वेळीच लक्ष ठेवत धडक कारवाई केली. सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन धारदार तलवारी, दुचाकी आणि मोबाईल फोन असा सुमारे १.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना काही युवक शस्त्रांसह शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने परतवाडा रोडवरील हॉटेल पद्मश्री परिसरात सापळा रचला. संशयितांची दुचाकी दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर काळे नगर लेआऊट परिसरात त्यांना घेराव घालून पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या युवकांची झडती घेतली असता वंश दिपक साहू वय २० रा. शनिवारा अंजनगाव सुर्जी याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तर अनिल मदन सोळंके वय २३ रा. विलास नगर अमरावती व अलकेश दिपक पवार वय २२ रा.आठवडी बाजार परतवाडा यांच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. या शिवाय आरोपींकडील सुजुकी ॲक्सेस दुचाकी एमएच २७ ईए ८०७७ आणि तीन मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ५६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल चांदोरे, उपनिरीक्षक विशाल पोळ आणि डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!