Tuesday, April 14, 2026
Homeनेशनल न्यूज़संग्रामपूर शहरात नवदुर्गा देवी मूर्तीचे जल्लोषात आगमन; गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक गर्दी!...

संग्रामपूर शहरात नवदुर्गा देवी मूर्तीचे जल्लोषात आगमन; गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक गर्दी! वाहतुकीचे मार्ग वळवले

(मतीन शेख)

 

संग्रामपूर: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संग्रामपूर शहरात ओम दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक १९ सप्टेंबर रोजी नवदुर्गा देवी मूर्तीचे आगमन मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीस हजारोंच्या संख्येने नागरिक, युवक-युवती, महिला व वयोवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, गेल्या १०० वर्षांपासून एवढी गर्दी कधीच पाहायला मिळाली नव्हती, असे अनेकांनी सांगितले. गर्दीच्या नियंत्रणासाठी तामगाव पोलिसांनी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स लावून एस.टी. बस व अन्य वाहनांची वाहतूक शहराऐवजी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. संध्याकाळी ६ वाजता तहसील कार्यालयापासून सुरु झालेल्या मिरवणुकीत शहरातील प्रसिद्ध वाद्यवृंद, गायक, संगीतकार सहभागी झाले होते. मिरवणूक पंचायत समिती, पोलीस ठाणे, बाजारपेठ मार्गे पुढे जात श्री गजानन महाराज आधिष्ठान मंदिराजवळ आली. या ठिकाणी दुर्गादेवीची मूर्ती स्थापन करण्यात आली. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर रस्त्यावर उतरले होते. विविध वयोगटातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि पारंपरिक पोशाख, ढोल-ताशांच्या गजरात देवीचे आगमन हा अनुभव हजारोंनी “आयुष्यात पहिल्यांदाच” पाहिल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या गर्दीमुळे एस.टी.बस, चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक जि.प. हायस्कूल जवळील खालच्या रस्त्याने वळविण्यात आली. पोलीस निरीक्षक सोनोने व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विलास बोपटे, जीवन सोनवणे, महिला पोलीस कर्मचारी, बीट जमादार, गुप्त पोलिस अंमलदार मनिष वानखडे व होमगार्ड यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

 

 

१०० वर्षापुर्वीतर सोडा परंतु जुन्या व तरुण पिढीतही माझे ६८ वर्षात कधीही एवढी गर्दी दिसली नाही.

रामेश्वर गायकी जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!