(मतीन शेख)
बुलढाणा: डिग्रस गावात उभ्या वाहनांमधून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्याला अंढेरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १९ सप्टेंबर रोजी अटक केली. गणेश भिकाजी हुसे रा.डिग्रस ता.देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेल्या तिन्ही बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. १७ सप्टेंबरच्या रात्री डिग्रस येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद विठोबा मांटे व अनंता मांटे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरच्या दोन बॅटऱ्या आणि मनिष वाघ यांच्या अशोक लिलँड टिप्परची एक बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या घटनेची तक्रार प्रल्हाद मांटे यांनी १८ सप्टेंबर रोजी अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हुसे याचा शोध घेण्यात आला. १९ सप्टेंबर रोजी तो चोरीस गेलेल्या बॅटऱ्यांसह गावातच सापडला. पंचासमक्ष तीनही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुरेश जारवाल, बिट जमादार मारोती कायंदे, पो.कॉ. सिद्धार्थ सोनकांबळे, पंढरी नेमाने, नितीन फुसे व अमोल थोरे यांच्या पथकाने केली.