(मतीन शेख)
नागपूर: पोलीस उपनिरीक्षकाच्या प्रतिष्ठेच्या पदावर निवड होऊन पुढील उज्ज्वल भविष्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या एका नव्या पीएसआयने केवळ ६ हजार रुपयांच्या लालचेत आयुष्यभरासाठी “भ्रष्टाचाराचा शिक्का” आपल्या नावावर कोरून घेतला आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पीएसआय आकाश साकोरे वय २८ आणि महिला हेड कॉन्स्टेबल शारदा सदाशिव भेरे-आलोटकर या दोघांनी मिळून विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या बदल्यात ८ हजारांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या विमा दाव्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी करताना पीएसआय साकोरे आणि हेड कॉन्स्टेबल भेरे यांनी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने ही लाच नाकारून थेट नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर बुधवार दि.१७ सप्टेंबर रोजी एसीबीने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात सापळा कारवाई रचली. तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची रक्कम घेतल्यानंतर शारदा भेरे यांनी त्यातील ६ हजार रुपये पीएसआय आकाश साकोरे यांच्याकडे सुपूर्द केले. याच वेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एसीबीच्या पथकात पोलीस उपअधीक्षक शुभांगी वानखडे, निरीक्षक रवींद्र सहारे, वैशाली आठवले, हेडकॉन्स्टेबल वंदना नगराळे, सरिता राऊत, अनिल बहिरे, अमोल मेंघरे आणि विजय सोळंके यांचा समावेश होता. घटनेनंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून दोघेही आरोपी त्या परिसरात राहत असल्याने त्यांच्या घरीही झडती घेण्यात आली आहे. दोघांविरोधात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.