(मतीन शेख)
मलकापूर: गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक सातत्याने कारवाई करत आहे. १८ सप्टेंबर रोजी मलकापूर शहरात एलसीबीने मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेली ओमनी कार पकडली असून एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ६ लाख ३८ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मलकापूर शहरात ओमनी कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पानमसाला व गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे समजले. यावरून एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचत एमएच-०२-एवाय-५०५६ या क्रमांकाची ओमनी कार अडवली. तपासात कारमधून ५ लाख ५८ हजार ९७० रुपयांचा गुटखा व ८० हजार रुपयांचे वाहन असा एकूण ६.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रोख यासीन शेख रहेमान वय ४४ रा.पारपेट मलकापूर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पो.उपनिरीक्षक पंकज सपकाळ, हेकॉ. एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळे, अजिज परसुवाले, विक्रांत इंगळे व चालक पोकॉ. शिवानंद हेलगे यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मलकापूर शहर पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.