(मतीन शेख)
बुलढाणा: प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बावनबीर गावात सध्या विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे. तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असताना सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या विजेच्या अडथळ्यांमुळे घरातील पंखे, कुलर आणि पाण्याच्या मोटारी बंद पडत आहेत. परिणामी नागरिकांना उकाड्यासह पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना उष्णतेचे तीव्र चटके सहन करावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी अनेकदा महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल सतत ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे समस्या मांडायची कुणाकडे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दरम्यान, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बावनबीर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

